-प्रबळगड परिक्रमा ट्रेक-
सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशनचा 'अनुभवी/मुरलेल्या फक्त ४० गिर्यारोहकांसाठीच प्रबळगड परिक्रमा' असा संदेश २८ मे रोजी मिळाला आणि मी आणि प्रभाने लागलीच नोंदणी करून टाकली. परिक्रमा करताना शक्य झाले तर कलावंतीण दुर्गाची चढाई करायची असा एक विचार डोक्यात होता.
ठरल्याप्रमाणे शनिवार एक जूनला रात्री साडेदहा वाजता आमची बस पुण्यातील गुलटेकडी बाजाराच्या जवळ असलेल्या हाईड पार्कवरून निघाली. वाकडपर्यंत एकेक सदस्याला घेत आमची बस २:३० वाजता प्रबळगडच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी जवळच्या वाहनतळावर पोचली.
सर्वजण बुट घालून तयार झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सुरेंद्र (भाऊ) दुगडनी ट्रेकची रुपरेषा आणि ट्रेकसंदर्भातील सुचना सर्वांना सांगितल्या. मी आणि महेंद्रने "कलावंतीण करता येईल का?" असे गुपचुप विचारले असता "आपला हा ट्रेक खुप फाडू आहे त्यामुळे तुम्ही कलावंतीणचा विचार डोक्यातून काढून टाका" असे भाऊने सांगितले. खरोखरच हा ट्रेक कसलेल्या गिर्यारोहकांसाठीसुद्धा किती फाडू आहे याची पुढच्या बारा तासात प्रचिती आली. संपूर्ण ट्रेक घनदाट जंगलातून असून जास्तीत जास्त वीस टक्के ट्रेकमध्ये उन असेल असेही भाऊने सांगितले. प्रबळमाची सोडताना प्रत्येकाने बरोबर किमान चार लीटर पाणी ठेवावे असे भाऊने दोनदोनवेळा बजावून सांगितले तसेच ज्यांचे पाणी कमी होईल त्यांनी आमचा वाटाड्या रघूच्या प्रबळमाचीवरील घरून पाणी भरून घ्यावे असे सांगितले.
आवश्यक सुचना संपल्यावर तीन वाजता आम्ही प्रबळमाचीच्या दिशेने प्रस्थान केले. प्रबळमाचीचा चढ आणि अंधार असूनसुद्धा असणारा प्रचंड उकाडा यामुळे लवकरच सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या. चार सव्वाचारला आम्ही प्रबळमाचीला पोचलो. शेवटच्या माणसाला घेऊन भाऊ आल्यानंतर आम्ही आमचा वाटाड्या असलेल्या रघूच्या घरी गेलो. वाटेत कोठेही पाणी मिळण्याची शक्यता नसल्याने प्रत्येकाने पोटभर पाणी पिऊन जवळ किमान चार लीटर पाणी घ्यावे असे परत एकदा भाऊने बजावले. तसेच उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून ही परिक्रमा आपण विपरित दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे करणार असल्याचे सांगितले.
कोणीतरी ट्रेकर ग्रुप प्रथमच ही परिक्रमा करत असल्याचे वाटाड्या रघूने सांगताच आता पुढे काय वाढून ठेवले असेल याचा आम्हाला अंदाज आला.
रघूला सोबत घेऊन पावणेपाचला आम्ही त्याच्या घरून प्रबळमाचीच्या दक्षिण बाजूला असलेल्या महादेव मंदिराकडे चालायला सुरूवात केली. वाटेत काजव्यांनी पूर्णपणे चमचमणारी झाडे आमचे डोळे दिपवून टाकत होती.
सहा वाजता आम्ही महादेव मंदिरात पोचलो. तीन तासाच्या चालीने भल्या पहाटे भुक लागलेल्या सर्वांनीच आपापले डबे उघडून न्याहारी केली. पंधरा वीस मिनिटात मंदिरातून निघालो.
दाट झाडीतून समोर दक्षिणेला ईर्शाळगड आम्हाला त्याचे वैभव दाखवत होता. अंदाजे सातला आम्ही प्रबळगडाच्या काळ्या बुरुजाखालच्या भागात आलो. तेथे शेवटचा माणूस यायची वाट पाहत थांबलो. दहा पंधरा मिनिटांत तो आला.
वाट पाहून मला कंटाळा आला होता आणि दरीतून माझे मित्र सुद्धा चिवचिवाट करत मला बोलवत होते म्हणून बुटालांना सांगून मी एकटाच वाटेवरच घळीपलिकडच्या दगडावर जाऊन थांबलो. मला पाहताच बुलबुल, वटवट्या, चिरक तसेच दयाळ सारखे माझे छोटे मित्र एकदम खुश झाले आणि त्यांनी मला त्यांचे ते स्वर्गिय संगीत ऐकवायला सुरूवात केली. ते ऐकताना माझी एवढी तंद्री लागली कि ते संगीत रेकॉर्ड करायचे भानसुद्धा मला राहिले नाही पण मन मात्र तृप्तीने प्रसन्न झाले होते. किमान दहा मिनिटे तरी मी ते स्वर्गिय संगीत अनुभवत होतो. घळीच्या पलिकडून गणेशने फोटोसाठी आवाज दिल्यामुळे माझी तंद्री मोडली.
सर्वजण आल्यानंतर पुढे निघालो. अशातच दाट जंगलातून चालताना माझा शिकारी मित्र सर्पगरुडाने शिटी मारून मला हाक मारली. गर्द झाडीत तो काही मला दिसेना आणि तो मात्र सारखी सारखी शिटी मारत 'मला शोधून दाखव' असे आव्हान मला देत होता. शेवटी समोरच्या टेकडीवरील झाडांमध्ये तो मला दिसला. मी लगेचच गणेशला आवाज देऊन माझ्या या मित्राबरोबर त्याची ओळख करून दिली. अंदाजे तीन फूट पंखविस्तार असलेला हा मित्र भेटल्यावर मी आणि गणेश दोघेही खुश झालो मात्र फोटो घेण्याएवढा वेळ मात्र या विहंगराजाने आम्हाला दिला नाही. दर्शन देऊन लगेचच तो झाडांमध्ये अदृश्य झाला.
आमचे मार्गक्रमण चालूच होते. काही वेळातच गरुड दिसला होता त्या टेकाडावर आम्ही पोचलो. तेथून समोरच पूर्वेला माथेरान आणि उजव्या हाताला खाली मोरबे धरणाचा जलाशय दिसत होता.
यानंतर जंगल एवढे दाट होते कि सूर्यप्रकाश जमिनीवर पोहचत नव्हता. त्यातूनच वाट काढत रघू आम्हाला घेऊन जात होता. शरीरातील प्रत्येक सांध्याचा वापर करित कधी उडी मारून, कधी वाकून तर कधी रांगत जायला लागत होते. असेच जंगलातून चढ-उतार करत जात असताना साडेनऊला झाडांमध्येच जेवणासाठी अर्धा तास थांबलो.
जेवण झाल्यानंतर काहीवेळ विश्रांती घेऊन निघालो. आता कोरडा ठण असलेल्या धबधब्यात फोटो काढायला आणखी वीसेक मिनिटे तरी गेली असतील. इथले दृश्यच एवढे सुंदर होते की तेथे फोटो न घेणारा माणूस केवळ अरसिक!
पुढे चालत गेल्यावर प्रबळगडाच्या ईशान्य कोपऱ्याच्या बाजूला यायला साडेअकरा वाजले. तेथे परत एकदा शेवटच्या माणसाची वाट पाहत जवळपास पाऊण तास थांबलो. काहींनी त्या अवधीमध्ये आडवे होऊन मस्तपैकी झोप घेतली. माझ्या टिवल्याबावल्या मात्र चालूच होत्या आणि गणेशसुद्धा माझे फोटो काढून मला प्रोत्साहन देत होता.
शेवटच्या माणसाचा आवाज आल्यानंतर आम्ही तेथून हललो. यानंतर पश्चिमेकडे जाताना वाळलेल्या खुरट्या झुडपांचे रान होते. सावली नसल्याने सू्र्याजीरावांच्या आगीची धग येथे चांगलीच जाणवत होती. परंतू थोड्याच वेळात आमची वाट दाट जंगलातील चढ-उतारांमध्ये घुसली. लवकरच समोर डाव्या बाजूला कलावंतीणचा सुळका दिसायला लागला. एकदम हुश्श झाले. पण तासभर चालूनही तो काही जवळ यायचे नाव घेईना. पाणी संपत आल्याने तेही काटकसरीने वापरणे गरजेचे होते. शेवटी अंदाजे दीडला आम्ही कलावंतीण सुळक्याला पार केले. पुढे करवंदांचा आस्वाद घेत दहा मिनिटात प्रबळमाचीवरील वस्तीमध्ये आलो.
समोरच रघू बसलेला पाहून एकदम हायसे वाटले. पाण्याच्या दोन रिकाम्या बाटल्या त्याच्याकडे देऊन पाणी आणण्याची त्याला विनंती केली. तो आल्यावर लगेचच प्रबळमाचीवरून वाहनतळाकडे उतरायला लागलो.
जवळपास अकरा तास दाट जंगलातून चालल्यानंतर आता या उघड्या वाटेवरून चालताना सूर्याजीरावांच्या आगीची धग मात्र सहनशक्तीचा अंत पाहणारी होती. शेवटी अंदाजे सव्वातीनला वाहनतळावर पोहचलो आणि आमची सव्वाबारा तासांची पायपिट संपली.
वाहनतळावरील झाडांच्या सावलीमध्ये काहीजण आडवे झालेले होते तर गणेश आणि बुटाला इतर मंडळींसोबत ताक बनवायच्या कामात व्यस्त होते. ताक बनवून झाल्यावर त्याचे दोनदोन पेले भरून पिताना अमृत पित असल्याची अनुभूती येत होती. जोडीला चितळेंची बाकरवडीही होती.
"शेवटच्या माणसासोबत यायला आम्हाला अजून एक तास लागेल, मी माझ्या मित्राच्या गाडीतून येतो. तुम्ही निघा!" असा भाऊचा संदेश मिळाला आणि चार वाजता आमची बस पुण्याच्या दिशेने निघाली.
बस वळताना पाहिले तर कलावंतीण माझ्याकडे पाहत छद्मीपणे हसत असल्याचा मला भास झाला. मागच्या आणि आताच्या दोन्हीवेळा तिची फक्त नजरभेटच झाली होती. त्यामुळे परत फक्त तुला भेटण्यासाठीच येईन असे तिला मनातल्या मनात आश्वासन दिले. त्याला प्रत्युत्तर म्हणून तीने अगदी गोड हसून मला निरोप दिला. शेजारचा धीरगंभीर प्रबळगड आमच्या या मूकसंवादाकडे पाहत गालातल्या गालात हसत होता. कारण त्याला माहित आहे कि त्याला भेटल्याशिवाय मी काही कलावंतीणीची भेट घ्यायला जाणार नाही.
घरी पोचायला रात्रीचे साडेआठ वाजले. शरीर पूर्ण दमलेले होते पण बावीस किलोमीटरचा घनदाट जंगलातील एवढा भन्नाट ट्रेक केल्याचे समाधान खुप मोठे होते. हृतिकने स्वतः प्रथमच बनवलेल्या खमंग मिसळीचा आस्वाद घेऊन लगेचच निद्रादेवीच्या अधीन झालो.
महत्वाचा इशारा : चांगला वाटाड्या आणि प्रतीव्यक्ती किमान पाच लीटर पाणी सोबत घेतल्याशिवाय हा ट्रेक करायचा प्रयत्न केल्यास ते जीवावर बेतू शकेल हे लक्षात ठेवावे. तसेच हा ट्रेक पावसाळ्यात करू नये.
© बापू झुरंगे